बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरामध्ये घडला आहे.


मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील ८ मोठे पूल, एक मोठा रस्ता आणि १२ सिमेंट नाल्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी दुसरी योग्य जागा मिळत नसल्यानं याठिकाणी हेलीपॅड बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणण आहे.

नेमका प्रकार काय?

मलकापूरचे भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या वाढदिवसासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे. नांदुऱ्यात होणाऱ्या आमदारांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. त्यासाठी हेलिपॅड बांधलं जात आहे. पण ते बांधत असताना प्रशासनाने सुमारे दीड कोटींच्या विकास कामांवरच बुलडोझर चालवला.

जिगावच्या प्रकल्पात आपलं घर दार बुडालेले लोक इतरांच्या  भल्यासाठी पुनर्वसित झाले. नव्याने संसार उभा केला पण त्यालाही राजकारण्यांच्या वाढदिवसाची नजर लागली. आता मुख्यमंत्री जेव्हा हेलिकॉप्टरमधून या हेलिपॅडवर उतरतील, तेव्हा त्यांच्या पायदळी पुनर्वसित गावकऱ्यांचा त्याग असेल.

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण एबीपी माझानं उघडकीस आणल्यानंतर विरोधकांनी देखील यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यासाठी अशाप्रकारे विकासकामं उद्धवस्त करणं चुकीचं असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकाराबाबत मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.