नंदुरबार: धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावहून सुरतकडे जात असताना बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील दर्ग्या जवळील पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही प्रवासी गंभीर आहेत.

प्राथमिक माहितीनुसार खाजगी ट्रॅव्हल्समध्ये अंदाजे 40 प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात हा रात्री दोन ते अडीच दरम्यान असल्याने प्रवासी झोपेत होते. दरम्यान अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे.


जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे विसरवाडी, नवापूर, खांडबारा , नंदुरबार, पिंपळनेर, दहिवेल येथील 108 रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले असून उपचारासाठी तातडीने विसरवाडी रुग्णालयात हलविण्याचे काम रुग्णवाहिकांद्वारे सुरू आहे..

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.