तुळजापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. परंतु शरद पवार यांनीही यावर विषयावर थेट वक्तव्य करण्याऐवजी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. राजकीय कर्तृत्त्वाची भाजप नोंद घेत नसल्याची खंत खडसेंना वाटत असेल, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. तुळजापूरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यतांबाबत शरद पवार यांना विचारणा केली. "खडसे हे विरोधीपक्षनेते होते, अर्थमंत्री होते. एका पक्षाच्या उभारण्यात त्यांचं फार योगदान होतं. त्यांच्या त्यागाची नोंद घेतली जात नसल्याने ते सध्या पक्षांतराच्या विचारात असतील, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.


राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, " खडसे महाराष्ट्राची विरोधी पक्षनेते होते, अर्थमंत्री होते. एका पक्षाच्या उभारणीसाठी त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांनी काही वेळा आम्हाला शिव्याही दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची तीव्रता आम्ही पाहिलेली आहे. त्यांची क्षमता, त्यांचं कर्तृत्त्व आणि लोकांमधील स्थान या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित नाही. राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. विरोधकांमध्ये सर्वात प्रभावी विरोधी पक्षनेते होते. दुर्दैवाने त्यांचं कर्तृत्त्व, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट याची नोंद घेतली नसेल, असं कदाचित त्यांना वाटत असेल. असं वाटणारा माणूस कधीतरी या विचाराअंती येतो की जिथे नोंद घेतली जाईल, तिथे जावं का?"


आप्तस्वकीयांना नो एन्ट्री
सोडून गेलेले काही नेते परत येत आहेत ही चर्चा निश्चित आहे. त्याचा विचार आम्ही करत आहोत. पण तो करताना आम्ही काही भाग ठरवले आहेत. आता उदाहरणार्थ उस्मानाबाद. आम्ही इथे निकाल घेतला, इथे एन्ट्री नाही. गेलेत तिथे सुखी रहा, असं शरद पवारांनी हात जोडून सांगितलं. राणा जगजीत, पद्मसिंह या आप्तस्वकीयांनाच नो एन्ट्री असल्याचं शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं.


दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. शिवाय एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याचंही वारंवार समोर आलं आहे.


संबंधित बातम्या


राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच'


नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, समर्थक उदेसिंग पाडवी यांचा दावा


उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?


थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...


Eknath Khadse | स्पेशल रिपोर्ट | नाराज एकनाथ खडसे हाती घड्याळ बांधणार का?