मुंबई : सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान शनिवारी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच लागले आहे. त्या विधानावरुन शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय? असा टोला शिवसेनेने भाजपला लगवला आहे.
107 देशांच्या यादीत हिंदुस्थान 94व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 88, बांगलादेश 71, म्यानमार 78व्या क्रमांकावर आहे. नेपाळ, चीन, श्रीलंकेचे आपल्यापेक्षा बरे चालले आहे. हे सर्व का घडते याचे उत्तर मोदी सरकारातील मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका झटक्यात देऊन टाकले. सरकार चालविणे येडयागबाळयाचे काम नाही हेच त्रिवार सत्य आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही. कारण उद्योग, व्यापार क्षेत्रात आजही निराशा, भयाचे वातावरण आहे. हिंदुस्थानचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला हा धक्का आहे. म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील. मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचे उत्तर भाजपचे केंद्रीयमंत्री दानवे यांनी दिले आहे. राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय? असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
काय म्हटलं आहे अग्रेलखात?
सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे गावरान विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे हे विधान राष्ट्रीय स्तरावर घेतले पाहिजे. कारण भूक किंवा कुपोषणाच्या बाबतीत हिंदुस्थानची स्थिती अत्यंत गंभीर आहे. एकीकडे आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नगारे वाजवीत आहोत. दुसरीकडे देशातील 14 ते 15 टक्के लोकसंख्येला पोटभर अन्न नाही. भुकेच्या बाबतीत गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत हिंदुस्थानचा समावेश व्हावा ही मोदी सरकारची मानहानी व देशाची शोकांतिका आहे कुपोषणाचे बळी वाढत आहेत. बेरोजगारी, भूक यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे.
हिंदुस्थानात ही स्थिती आली कारण सुमार दर्जाची अंमलबजावणी प्रक्रिया, प्रभावी देखरेखीचा अभाव, कुपोषणाची समस्या हाताळण्यातील उदासीन दृष्टिकोन आणि मोठया राज्यांची असमाधानकारक कामगिरी ही प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे जागतिक तज्ञांनी म्हटले आहे. हा सरळ केंद्राच्या अकार्यक्षमतेवर ठपका आहे. राज्य चालविणे म्हणजे विद्वेष पसरविणे नव्हे. कुणी भूक, बेरोजगारीवर प्रश्न उपस्थित करीत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी हिंदू-मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तानसारख्या मुद्दय़ांचे मृदंग थापडवायचे. नोटाबंदी, जीएसटीने देशाची आर्थिक ताकद कमजोर केली. लोकांनी रोजगार गमावला, पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेल वगैरे विषय बाजारात आणून चर्चा घडविणे हेच देशातील वाढत्या भूक अराजकाचे लक्षण आहे. देशातील गंभीर समस्यांबाबत मतभेद दूर ठेवून एकमेकांशी संवाद ठेवायला हवा.
देशातील श्रीमंतांची यादी डोळेझाक करण्यासारखी नाही. तरीही देशातील 15 टक्के लोक कुपोषित व 35 टक्के लोक पोटभर खाऊ शकत नाहीत याचे उत्तर दानवे यांनी दिले. सरकार चालविणे म्हणजे येडय़ागबाळय़ाचे कामच नव्हे. देशाची पत ज्या वेगाने घसरत आहे ते पाहिल्यावर चिंता वाटावी असेच वातावरण आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी आता म्हणाले आहेत, ”देशातला गरीब भुकेकंगाल आहे. कारण सरकार आपल्या खास मित्रांचेच खिसे भरण्यात मशगूल आहे.” आता यावर गांधींना ठरवून ‘ट्रोल’ केले जाईल, पण त्यामुळे देशातील लोकांना अन्न, रोजगार मिळणार आहे का?
बिहारात भुकेपेक्षा सुशांत राजपूत प्रकरण जोरावर आणले. उत्तर प्रदेशात भूक, रोजगार सोडून इतर विषयांवर चर्चा जास्त असते. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही. कारण उद्योग, व्यापार क्षेत्रात आजही निराशा, भयाचे वातावरण आहे. हिंदुस्थानचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला हा धक्का आहे. म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील. मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचे उत्तर भाजपचे केंद्रीयमंत्री दानवे यांनी दिले आहे. राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय?
Danve on CM Thackeray | घराबाहेर पडल्यास एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का? : रावसाहेब दानवे