गजानन पाटील लाचखोरी प्रकरणी खडसेंना क्लीनचिट
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 06:05 PM (IST)
मुंबईः गजानन पाटील लाचखोरी प्रकरणी लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली आहे.या प्रकरणात एकनाथ खडसेंचा हात नसल्याचा निर्णय लोकायुक्त एम. एल. तहलिया यांनी दिला आहे. लोकायुक्तांच्या या निर्णयामुळे एकनाथ खडसेंना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. अंबरनाथमधील जमीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात एकनाथ खडसेंचे कथित पीए गजानन पाटील यांनी 30 कोटींची लाच मागितल्याचा आरोप रमेश जाधव यांनी केला होता. काय आहे प्रकरण? लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीनं गजानन पाटलाला मंत्रालयाबाहेर रंगेहात अटक केली होती. या लाचखोरी प्रकरणी तक्रारदार रमेश जाधवांनी एकनाथ खडसेंविरोधात लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यातील संभाषणाच्या 12 रेकॉर्डिंग तपासल्या. मात्र ती 30 कोटींची लाच एकनाथ खडसेंद्वारे मागितल्याचं कुठंच सिद्ध होत नसल्यामुळं लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली आहे.