Eknath Khadse : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असं म्हणत एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवल्याचे खडसे यावेळी म्हणाले.
यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा
आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असे एकनाथ खडसे म्हणाले. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवण हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक असल्याचे खडसे म्हणाले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाबाबत एकनाथ खडसे यांनी ही खंत व्यक्त केली. डोंबिवलीत आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीनं लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित 'लेवा साहित्यिक रत्ने' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि लेवा साहित्यिकाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
रश्मी शुक्ला यांना क्लीनचेट दिल्याने केसचं भवितव्य अंधारात
रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. याबाबत बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी रश्मी शुक्ला ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या, त्याचदिवशी रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळेल असं वाटलं होतं असे खडसे म्हणाले. त्यांनी फोन टॅपिंगसाठी मदत करत असताना ते त्या ठिकाणी प्रमुख होत्या. माझाही फोन 68 दिवस टॅप करण्यात आला. तो कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला अजूनही मला कल्पना देण्यात आली नाही. FIR दाखल झालेला आहे, चौकशी सुरू असे सांगण्यात येते. रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. आता त्यांना क्लीन चीट दिलेली आहे. त्यामुळं आता या केसचं भवितव्य अंधारात असल्याचे खडसे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: