नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हावं वाटेल, पण हा पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय असतो, असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. ज्येष्ठतेनुसार मी मुख्यमंत्री पाहिजे होतो, या खडसेंच्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य केलं.
उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला संघर्ष नवा नाही. दोघेही एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने नेहमी कुरघोडी करताना दिसतात. महाजनांनी पुन्हा एकदा खडसेंवर हा निशाणा साधला आहे.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
''खडसे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांचं स्टेटमेंट मी वाचलेलं आहे. ज्येष्ठतेनुसार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं ते म्हणाले. खरंय, ते मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत, त्यामुळे निश्चित त्यांचा तो अधिकार आहे. पण पक्षाने निर्णय घेतल्यामुळे मी झालेलो नाही असं त्यांनी सांगितलं. केंद्रामध्येही अनेक जण ज्येष्ठ आहेत, पण मोदींना तिथे संधी मिळाली,'' असं गिरीश महाजन म्हणाले.
पुढे ते म्हणाले, की “उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अनेक ज्युनिअर लोक असतात, त्यांनाही कधी कधी संधी मिळत असते. त्यांना (खडसेंना) जे वाटतं, ते खडसे साहेब बोलले. केंद्रापासून खालीपर्यंत अगदी जळगावपर्यंत पाहिलं तर अनेक ज्युनिअर लोकांना वरती संधी मिळालेली आहे. हा पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय असतो. त्यांना वाटू शकतं, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, पंतप्रधान झालो पाहिजे,'' असं म्हणत गिरीश महाजनांनी टोला लगावला.
खडसेंना वाटू शकतं, मी मुख्यमंत्री, पंतप्रधान झालो पाहिजे : महाजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2018 08:02 AM (IST)
ज्येष्ठतेनुसार मी मुख्यमंत्री पाहिजे होतो, या खडसेंच्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य केलं. खडसेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झालो पाहिजे, असं वाटू शकतं, असं गिरीश महाजन म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -