रत्नागिरी : गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेले कोरोना अशी टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीकडून देखील परिणामांना सामोरं जा असा इशारा देण्यात आला. शिवाय, पडाळकर यांच्याविरोधात बारामतीमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गृहखाते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मस्ती आली आहे. या साऱ्या प्रकरणात आमच्या नेत्याच्या अंगावर येण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पण, त्यांनी एक बाब लक्षात ठेवावी आमच्या अंगावर आल्यास आम्ही देखील अंगावर जाऊ. गोपीचंद पडाळकर काय बोलले याच्या खोलात मला जायचे नाही. आमच्या नेत्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. पण, आम्हाला धमकी देऊ नये असा इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला आहे.


रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं गोपीचंद पडाळकरांविरोधात आंदोलन करत त्यांच्या या शरद पवारांविरोधात केलेल्या विधानाचा जाहीर निषेध केला. रत्नागिरीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसने पडाळकर यांच्याविरोधात आंदोलन केले आहे.


सामंत यांच्यावर निशाणा


यावेळी निलेश राणे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. कोरोनाच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती वाईट आहे. आरोग्य सेविकांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली गेली नाही. कोरोनाच्या काळात स्थानिक आमदाराच्या लोकांना दारूच्या बाटल्या पोहोचवल्या, असा थेट आरोप देखील केला. शिवाय, जिल्ह्याला पालकमंत्री आहे कुठे? अनिल परब अडीच दिवसांकरता आले आणि गेले अशी टीका देखील यावेळी निलेश राणे यांनी केली.


सामना पुसायला वापरतात


दरम्यान, सामनामध्ये काँग्रेसच्या नाराजीबाबत आलेला अग्रलेख आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी राऊतांना लिहिलेले पत्र याबाबत देखील विचारण्यात आले. त्यावर 'मी सामना वाचत नाही. मुंबईतील आमच्या झोपडपट्टीमध्ये सामना लहान मुलं पुसायसा वापरतात' अशी टीका देखील केली.


मुंबई - गोवा महामार्गाबाबत आंदोलन


मुंबई - गोवा महामार्गाचं काम रखडलेले आहे. शिवाय, अनेक ठिकाणी कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे. त्याबाबत लवकरच भाजप आंदोलन करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारी परिस्थिती पाहता याबाबचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती देखील रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिली.