Jalgaon Crime News : पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात रविवारी सकाळी घडली. मुकेश रमेश शिरसाठ (30) (Mukesh Ramesh Shirsath) असे मृत तरुणाचे नाव आहे. आपल्या मुलाच्या हत्येनंतर मुकेशच्या आईने टाहो फोडत पोलिसांवर (Jalgaon Police) गंभीर आरोप केलाय.
मयत तरुणाची आई उज्ज्वला शिरसाठ म्हणाल्या की, माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. मी धुणं भांड्याचे काम करते. माझा नवरा हमाली करतो, मी कस काय दोन लेकरांना सांभाळू. आता मी त्यांना कसे वाढवू. आम्हाला न्याय पाहिजे. प्रेम विवाह केला म्हणूनच त्यांनी हत्या केली. चार वर्षांपासून ते आम्हाला त्रास देत होते, शेवटी त्याला मारून टाकले असे म्हणत त्यांनी टाहो फोडला. तसेच, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलिसांकडून त्यांच्याकडून पैसे खाल्ले, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
मुकेशच्या पत्नीची प्रतिक्रिया
दरम्यान, मुकेश शिरसाठच्या हत्येनंतर त्याची पत्नीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. पूजा शिरसाठ म्हणाल्या की, आपण प्रेम विवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी माझ्या पतीची हत्या केली आहे. पतीच्या हत्येने माझे आणि माझ्या लहान मुलींचे भविष्य अंधकारमय झाले आहे. माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात राहणाऱ्या मुकेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. दोघांचा विवाह झाल्यापासूनच शिरसाठ कुटुंबीय व आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये सतत वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरीच्या मंडळींनी कोयता, चॉपरने मुकेशवर सपासप वार केले. या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तर मुकेशला वाचवण्यासाठी पुढे आलेले भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही सासरच्या मंडळींनी हल्ला केलाय. यात सात जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे. सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, बबलू बनसोडे, प्रकाश सोनवणे, अविनाश सुरवडे आणि एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
आणखी वाचा