सोलापूर : 14 फेब्रुवारीला शहीद दिन साजरा करण्यासंदर्भातील वादग्रस्त परिपत्रक काढणारे शिक्षण अधिकारी तानाजी घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण मंडळ आणि शिक्षण आयुक्तांची अवहेलना करण्याप्रकरणी शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
14 फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करावा, असं वादग्रस्त परिपत्रक काढल्यानं ते चर्चेत आले होते. मात्र ही टायपिंगची चूक असल्याचं सांगत हे परिपत्रक पुन्हा रद्दही करण्यात आलं होतं.
पण दुसरीकडं त्यांचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आंतरजिल्हा बदली प्रकरणीही वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्यांचे हे प्रकरण थेट मंत्रालयात गाजत होतं. त्यातच 14 फेब्रुवारी संदर्भातील वादग्रस्त परिपत्रक काढल्यानं शिक्षणमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षण आयुक्त कुमार यांनी ही केली.
काया होतं परिपत्रक?
14 फेब्रुवारी रोजी शहीद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं. त्यामुळे सर्व शाळांमध्ये या क्रांतीविरांच्या प्रतिमांचं पूजन करावं. शिवाय सर्व विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना आमंत्रित करावं आणि शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत देण्याचं त्यांना आवाहन करावं, असं परिपत्रक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं होतं.
पण भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. मग आपण 14 फेब्रुवारीला शहीद दिन का साजरा करत आहोत? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. यावर काही स्वातंत्र्य सैनिकांना 14 फेब्रुवारीलाही फाशी देण्यात आली आल्याचं सांगितलं जात होतं. पण नंतर चूक लक्षात आल्यावर टायपिंगची चूक असल्याचं सांगत हे परिपरित्रक रद्द करण्यात आलं.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून घाडगे गायब आहेत. तर घाटगे यांना निलंबित केल्यानंतर निलंबित कालावधीसाठी त्यांना सोलापूर मुख्यालय देण्यात आल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या
14 फेब्रुवारी शहीद दिन साजरा करा, शिक्षणाधिकाऱ्यांचं परिपत्रक