अहमदनगर : देवेंद्र फडणवीस गुंडांचे मुख्यमंत्री आहेत, हे आता लक्षात आलं का? असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. युतीत सडल्याचं 25 वर्षांनी कसं लक्षात आलं, असं म्हणत अजित पवारांनी चिमटे काढले आहेत. सहकारक्षेत्र मोडीत काढण्याचं काम भाजप सरकार करत असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला.
'उद्धव ठाकरे म्हणाले की फडणवीस गुंडांचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांची फार उशिरा सटकली. युतीत 25 वर्ष सडल्याचं ते म्हणतात, पण हे समजायला इतकी वर्षे लागले, हीच का ठाकरेंची दूरदृष्टी?' असा प्रश्न विचारताना 'शिवसेना-भाजप नेते एकमेकांची औकात काढतात, पण यामुळे नागरिकांच्या समस्या सुटणार नाहीत.' अशी टीकाही त्यांनी केली. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त अहमदनगरच्या पारनेरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.
'भाजपचे पालकमंत्री सुभाष देशमुख 'गुंडांना निवडून आणू, मग त्यांना सुधारु' अशी भाषा करतात. गुंड प्रवृत्ती राज्यानं मान्य केली नाही. मोक्का, तडीपारी, गुन्हेगार, खंडणी, वाळू माफियांना पक्षप्रवेश कसा देतात. गुन्हेगारांना निवडून दिल्यास वाटोळे होईल. त्यांना फक्त सत्ता दिसते आणि सत्तेतून पैसा. पंतप्रधानांची जाहिरात दीड हजार कोटी, नोटाबंदी असताना त्यांच्याकडे पैसा कसा आला?' असं अजित पवार म्हणाले.