सोलापूर : महाभारताची लढाई जिंकायची असेल, तर गुंडांना सोबत घेण्यात गैर काय? असा अजब सवाल भाजप खासदार शरद बनसोडे यांनी विचारला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची पाठराखण करताना बनसोडेंनी हे तर्कट मांडलं.


'होय ही महाभारताची रणभूमी आहे. आम्ही पांडव आहोत आणि ते कौरव आहेत. भ्रष्टाचाराचा दुशा:सन आम्हाला संपवायचा आहे आणि पारदर्शकतेच सुशासन आणायचं आहे.' असं सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे म्हणाले. 21 तारखेनंतर जे गायब होतील, जे सारखं बोट पुढे करुन बोलतात ते दिसणार सुद्धा नाहीत, ते या महाभारताचे शकुनी असतील असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांना
अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

महाभारताची ही लढाई जिंकण्यासाठी आम्हाला गुंडांना सोबत घ्यायचं असेल, तर त्यात गैर काय? असा सवाल बनसोडेंनी उपस्थित केला. आम्हाला काही करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं उदाहरण आहेच ना. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या महाभारतात आम्ही जर गुंडांना प्रवेश दिला असेल तर तो रणनीतीचा भाग आहे, असं अजब तर्कट खासदार बनसोडेंनी मांडलं.

फडणवीस गुंडांचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंना आता समजलं? : अजित पवार


'डॉन अरुण गवळी जेलमधून निवडणुका लढवतो, आम्ही तर ज्यांना प्रवेश दिला आहे, त्यांच्यावर फक्त आरोप झाले आहेत.' निवडणुका जिंकण्याचं हे अजब समीकरण शरद बनसोडे यांनी मांडलं आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचंही त्यांनी समर्थन केलं. काहीही होवो “मुंबई आमचीच” असा नारा खासदार बनसोडे यांनी दिला.

आधी गुंडांना निवडून आणू, मग त्यांना सुधारु : सुभाष देशमुख


वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु, असं अजब वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं होतं.