हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज (शनिवार 10 जुलै) थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. त्यांच्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनाची स्पीड वाढवल्याने अपघात टळला. मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला घासले गेले आहे.


शिक्षणमंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड ह्या दोन दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होत्या. शुक्रवारी त्यांनी जिल्हा नियोजन समिती, कोविड आढावा, खरीप आढावा बैठक घेऊन त्या मुक्कामी होत्या. आज सकाळी हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांन्टचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले आणि ते उद्घाटन आटोपून साडेबारा वाजता त्या आपल्या ताफ्यासह हिंगोली शहरातील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या. त्याचवेळी पीपल्स बँकेजवळ मोंढ्यातून येणाऱ्या पीक अप टेम्पो भरधाव येत वर्षा गायकवाड यांच्या कारवर धडकला. मात्र, त्यांच्या वाहनचालकाने गाडीची स्पीड वाढवली आणि त्यांची गाडी पुढे निघून गेल्याने हा टेम्पो गाडीच्या मागील बाजूस घासल्या गेला. सुदैवाने यात वर्षा गायकवाड यांना कुठलीही इजा झाली नाही, त्या सुखरूप आहेत. दरम्यान पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.



एकुणच घटना घडल्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपला नियोजित दौरा पुर्ण करून औंढा-जिंतुर मार्गे औरंगाबादकडे रवाना झाल्या आहेत.