मुंबई : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.
राज्यात जरी शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणमध्ये जरी आला असला तरी अन्य देशांमधील कोरोनाची दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुंबईतील शाळा या 16 जानेवारीपासून पुढील आयुक्तांचे आदेश मिळेपर्यत बंद राहतील, असं मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून सांगण्यात आलं आहे.
शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत आज करण्यात आले. यावेळी राज्यातील शाळांच्या गुणावत्तेचा जिल्हा निहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करित असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता हा विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे.आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा आणि त्यासाठी दरवर्षी किती निधी लागेल याप्रमाणे तरतूद करण्यात यावी.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखणे, 5 हजार आदर्श शाळांची निर्मिती करणे, शिक्षक भरती यासारखे उद्दिष्ट असलेले शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत आज करण्यात आले. परफॉर्मन्स ग्रेडिग इंडेक्समध्ये सुधारणा करण्यासाठी, शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे, शासन निर्णय, कायद्यांचे फेरनिरीक्षण व सुलभीकरण करणे, गुणवत्तेवर आधारीत मुख्याध्यापकांची भरती करणे यासारख्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही सादरीकरणादरम्यान प्रा. गायकवाड यांनी दिली.