मुंबई : विद्यार्थ्याच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबर शिक्षकांवर शाळा व्यतिरिक्त कामाचा भारदेखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो. त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री दादा भुसेंनी शिक्षक आणि अधिकाऱ्याची बैठक बोलावली होती.
शिक्षकांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांवरील असलेलं अतिरिक्त कामाचं ओझंही कमी करण्याचं आश्वासन दादा भुसेंनी दिलं. शिक्षकांकडे निवडणुका, शासकीय सर्व्हे आणि इतर कामे दिली जातात. त्यावरून राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा दादा भुसे यांनी घेतला.
दरम्यान, लवकरच शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून त्यांची पेंशनवर तोडगा काढला जाईल तसेच त्यांची शाळा व्यतिरिक्त कामे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार
राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्याच्या शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे. नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या 200 च्या वर आहे. स्वच्छता गृह, शाळा दुरुस्ती, ई - शाळा सुरू करणे, असे अनेक उपक्रम राबवणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याजवळ दिली आहे, हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे. परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू असं दादा भुसे यांनी म्हटलंय.
प्रत्येक शाळेच्या दारी शिक्षणमंत्री दिसणार
या विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल. शालेय शिक्षण मंत्री यापुढे तुम्हाला गाव खेड्यांमध्ये शाळांमध्ये व्हिजिट करणारे दिसतील. शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी यापुढे नक्कीच दिसेल. एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू, असेही दादा भुसे म्हणाले.
ही बातमी वाचा: