मुंबई : राज्याचे  परिवहन  मंत्री अनिल परब  यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश  या समन्समधून देण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.   दापोली साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय अनिल परब गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्याशी संबंधित सात संस्थांवर ईडीनं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या.  त्यानंतर आता ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनिल परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे


शिवसेना लक्ष्य?


केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही मातब्बर नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  


अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?


पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. 


ते रिसॉर्ट माझं नाही; अनिल परब यांचा दावा


काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी साई रिसॉर्टबद्दल अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम आहेत, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालं नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे."