मुंबई : ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरीत जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. भाजपचं कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही ईडीने नोटीस धाडली होती. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत महसूलमंत्री पदी असताना भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. खडसेंनी पत्नी मंदाकिनी यांच्या नावाने तीन कोटी 75 लाखांना तीन एकर जमिनीचा व्यवहार केला होता. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली होती. कोलकाता येथील उकानी आणि मंदाकिनी खडसे यांच्यात हा व्यवहार झाल्याचं दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आणि एकनाथ खडसेंच्या पदरी महसूल खातं आलं. त्यानंतर 28 एप्रिल 2016 मध्ये खडसेंचा याच भोसरी एमआयडीसीत पत्नीच्या नावे जमीन व्यवहार झाला. पण तत्पूर्वीच इथं अनेक कंपन्याचं काम सुरु होतं. मग हा व्यवहार कसा काय झाला? असा प्रश्न 30 मे 2016 साली तक्रारदार हेमंत गावंडेनी उपस्थित केला होता आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :