मुंबई: तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे पथक राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले आहे. त्या आधी एक तास वांद्रे येथील अनिल परब यांच्या निवासस्थानातून ईडीचे एक पथक बाहेर पडलं होतं. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी केली होती.
आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' येथे चौकशीसाठी आले होते.
मनी लॉड्रिंगप्रकरणी कारवाई नाही, अनिल परब यांची माहिती
अनिल परब म्हणाले की, "ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आहेत. या आधीही उत्तरं दिली आहेत, आजही सर्व उत्तरं दिली आहेत. बंद असलेल्या रिसॉर्टचे पाणी समुद्रात जात आहे असा आरोप करुन कारवाई केली जात आहे. यावर आता मनी लॉड्रिंगचा मुद्दा येतोय कुठे? या संबंधी आपण न्यायालयात भूमिका मांडू."
अनिल परब यांच्या निकटवर्तींयावर छापेमारी
अनिल परब यांच्यासह मुंबईतील आणखी एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीने छापा मारला आहे. अंधेरीतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. संजय कदम हे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय कदम हे अंधेरी पश्चिम शिवसेना विभाग संघटक आहेत.
ईडीकडून या ठिकाणी छापा
1. अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ
2. मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व
3. अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.
4. दापोलीतील साई रिसॉर्ट
5. दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी
6. दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय