रायगड : राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातही शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर रोज नवनवे आरोप आणि टीका करताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी रायगड जिल्ह्याचे युवा सेना अध्यक्ष आणि महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार भारतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपला खरा शत्रू भाजप नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं विकास गोगावले यांनी म्हटलंय. यावेळी विकासकामांच्या श्रेयवादावरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं.
शिवसेना संपर्क अभियानाअंतर्गत महाडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, आमदार भारतशेठ गोगावले यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना संपर्क अभियानावेळी युवासेनेचे रायगड जिल्हाअध्यक्ष विकास गोगावले यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं आणलेल्या विकासकामांचं श्रेय भाजप नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे, अशी टीका त्यांनी केलीय. तसंच आघाडीतील घटकपक्षातील कार्यकर्त्यांना फोडत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पक्षात प्रवेश देत असल्याची तक्रारही गोगावले यांनी वरिष्ठांकडे केली आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहनही त्यांनी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना केलं आहे.
महाड तालुका मतदारसंघात मुळात भाजपच नाही. भाजपचे इथे फक्त दोन ते अडीच हजार मतं आहेत. म्हणून आपला मूळ शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. कारण, इथे असणारा पदाधिकारी जो काम करतोय, जी विकासकामं आमदार भारतशेठ गोगावले मंजूर करुन आणतात, त्याचं श्रेय घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय आणि आपण म्हणतो की आपली आघाडी आहे. आपली आघाडी असली तरी दीड महिन्याच्या कालावधीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या ठिकाणी आले होते. त्यावेळी काँग्रेसचे चार माजी नगरसेवक, शिवसेनेचा एक माजी नगरसेवक घेतला होता. तुम्ही म्हणता की आघाडी टिकली पाहिजे, आम्ही ती टिकवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते बिघडवण्याचं काम करत आहेत. म्हणून याठिकाणी आवर्जून लक्ष घातलं पाहिजे, असं आवाहन विकास गोगावले यांनी आमदार राजन विचारे यांना केलं आहे.