Sanjay Raut Ed Inquiry : दहा तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईडी कार्यालयाबाहेर पडले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी आपण ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले.
दहा तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ईडीला आपण पूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. " ईडी ही केंद्राची तपासयंत्रणा असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य केले, त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी त्या दूर केल्या पाहिजेत, असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
मुंबईमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार संजय राऊत आज ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दुपारी बारा वाजल्यापासून ईडीने त्यांच्या चौकशीला सुरूवात केली होती. रात्री दहा वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. त्यानंतर संजय राऊत नुकतेच ईडी कार्यालयाबाहेर पडले आहेत.
दरम्यान, संजय राऊतांनी आज सकाळी ट्वीट करत ईडीच्या चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती दिली होती. तपासयंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य आहे, शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करु नये, असं आवाहन संजय राऊत यांनी शिवसैनिकांना ट्वीट करत केलं होतं. संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असताना शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं.
नेमका काय आहे हा घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.