ED Detain Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शिवेसना आमदार वैभव नाईक यांनीही संजय राऊत यांना अटक होणार आणि ते वर्षभर जेलमध्ये राहणार माहित असल्याचं वक्तव्य केले आहे. वैभव नाईक यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा तळ कोकणातून सुरू होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी आदित्य ठाकरे कुडाळमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तर सावंतवाडीत भव्य मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, 'शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजप विरोधात तसेच केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच त्यांच्यावर ईडीची कारवाई होत आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्र कोणापुढे झुकला नाही. तसेच संजय राऊत कुणापुढे झुकले नाहीत याचा आम्हाला अभिमान आहे. '
गेल्या आठ दिवसांपूर्वी मला संजय राऊत भेटले होते. वर्षभरासाठी मी नसणार आहे, माझी जी कामं आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. संजय राऊत यांना माहिती होतं की आपल्याला अटक होणार आहे. भाजप सध्या ईडीच्या माध्यमातून जेल की भाजप असे संपूर्ण भारतात पर्याय ठेवत आहे. अर्जुन खोतकर यांच्यासमोर सुद्धा जेल की भाजप असा पर्याय होता. त्यामुळे त्यांनी भाजपा पर्याय निवडला, मात्र संजय राऊत यांनी जेल हा मार्ग स्वीकारला. संजय राऊत यांची ही भूमिका बघून अनेक कार्यकर्ते घडतील, मात्र अर्जुन खोतकर यांची भूमिका घेऊन कार्यकर्ते घडणार नाही. त्यामुळे आम्हाला संजय राऊत यांच्या भूमिकेवर अभिमान आहे, असे वैभव नाईक म्हणाले.
रोज सगळ्यांची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाली असं नितेश राणेंनी म्हटले त्यावर वैभव नाईक यांनी नितेश राणेंच राजकारणच खराब झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणेंना मंत्रिपद पाहिजे म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची ते बाजू घेत आहेत. नितेश राणे आणि नारायण राणे यांनी ईडीच्या नोटीस आल्यानंतर भाजपा पर्याय निवडला अशी खोचक टीका वैभव नाईक यांनी केली आहे.