Pune Vinay Arhana : पुण्यातील नामांकित रोझरी स्कुल या शिक्षण संस्थेचा संचालक विनय अरहाना (Vinay Arhana) याला इनफोर्समेन्ट डिरेक्टरेट अर्थात ईडीने (ED) अटक केली आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेकडून शाळेच्या साहित्याच्या खरेदीसाठी आणि शाळेच्या इमारतींच्या नुतनीकरणासाठी घेतलेले वीस कोटी रुपयांचे कर्ज अरहाना याने बॉलीवूड सेलीब्रीटीजच्या इव्हेंटवर खर्च केल्याचं समोर आलं आहे.  


विनय अरहाना आणि त्याची रोझरी इंटरनॅशनल स्कूल ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची भरमसाठ फीसाठी रोझरीकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप करत अनेकदा पालकांनी आंदोलनं केली आहेत.  दुसरीकडे विनय अरहाना याची हाय फाय लाईफस्टाईल ही नेहमीच चर्चेचा विषय  राहिली आहे. 


 महागडे इव्हेंट्स, महागड्या गाड्या आणि शानशौकीन पणासाठी विनय अरहाना ओळखला गेला आहे.  तो संचालक असलेल्या रोझरी स्कुलसाठी काही साहित्य खरेदी करायचं आहे, त्याचबरोबर शाळेच्या काही इमारतींच रिनोव्हेशन करायच आहे असं कारण देत त्याने पुण्यातील कॉसमॉस बॅकेकडे लोन मागीतलं.  कॉसमॉस बँकेकडून त्याला तब्बल 46 कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज मंजुर करण्यात आलं. त्यापैकी 21 कोटी रुपये बँकेने अरहानाने सांगितलेल्या कंपन्यांच्या बॅक अकाउंटमधे जमा केले.  


मात्र या कंपन्या बोगस असल्याच पुढ उघड झालं. या बोगस कंपन्याच्या अकाउंटमधे जमा झालेले पैसै विनय अरहानाने पुढे स्वतःच्या अकाउंटमधे वळते केले आणि त्यामधून पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एका आलिशान हॉटेलमधे फॅशन शोचे अरहानाने आयोजन केलं. त्याचबरोबर बॉलीवूड सेलिब्रिटीजच्या वेगवेगळ्या इव्हेंट्सवरही अरहानाने उधळपट्टी केली. कॉसमॉस बँकेबरोबरच पुण्यातील इतरही अनेक बँकांकडून अरहानाने मोठ्या प्रमाणात लोन घेतल्याच समोर आलं असून त्या लोनचे पैसै अरहानाने कुठे खर्च केले याचा ईडीकडून तपास करण्यात येत आहे.