Chhatrapati Sambhaji Nagar News: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याच्या शासन निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात मराठवाड्यातून आक्षेप येऊ लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण 8 हजार आक्षेप, हरकतींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काही आक्षेप पोस्टाने देखील येत आहे. तर आक्षेप आणि हरकती यांच्यात रोज वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर 27 मार्चपर्यंत नागरिकांना या निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवता येणार आहे. 


राज्याच्या महसूल प्रशासनाने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याबाबत स्वतंत्र अधिसूचना 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जारी केली. तर महसूल आणि वनविभागाकडून काढण्यात अधिसूचनेत विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नामांतराबाबत 27  मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार नामांतराच्या विरोधात अनेक आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातून सर्वाधिक आक्षेप आणि हरकती नोंदवण्यात आले आहे. 


उपोषणास्थळी आक्षेप नोंदवण्याची व्यवस्था! 


दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात 4 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची देखील उपस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी नामांतराच्या निर्णयाला आक्षेप किंवा हरकत नोंदवणारे अर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यासाठी कोणतेही जबरदस्ती नसून, ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून अर्ज भरवून घेतले जात आहे.तसेच शहरातील इतर वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आक्षेप नोंदवणारे अर्ज भरून दिले आहेत. 


आता समर्थनार्थही फॉर्म भरले जाणार...


एकीकडे नामांतराच्या विरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवल्या जात आहे, तर दुसरीकडे सकल हिंदू एकत्रीकरण समितीकडून समर्थनार्थही अर्ज भरले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या निर्णयाला समर्थन असून, कोणत्याही हरकतीचा विचार करू नयेत असे या अर्जात लिहण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरात विशेष मोहीम राबवली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Imtiyaz Jaleel : उडवाउडवीचे उत्तर न देता नामांतराबाबत स्पष्ट भूमिका घ्या; उद्योजकांच्या भूमिकेवर जलील यांची प्रतिक्रिया