ED Arrest Advocate Satish Uke : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक समजले जाणारे अॅड. सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर आज त्यांना विशेष ईडी कोर्टात हजर करणार आहेत. जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर छापा मारला होता. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता अटक करण्यात आली. ईडीने अॅड. सतीश उके यांच्या भावालाही ताब्यात घेतले असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
नागपूरमध्ये ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन अॅड. सतीश उके यांना मुंबई आणण्यात आले आहे. ईडीकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांचे वकील अॅड. रवी जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी सांगितले की, नागपूरमधील उके यांच्या घरी ईडीने छापा मारला. त्यानंतर काल सतीश उकेंना अटक करण्यात आली. नागपूरमध्ये त्यांना कोणत्याही कोर्टात हजर करण्यात आले नाही. याउलट त्यांना घेऊन सकाळच्या विमानाने मुंबईत आणण्यात आले असल्याचा आरोप अॅड. जाधव यांनी केला.
ईडीकडून अॅड. सतीश उके यांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन सुरू होत असल्याचे अॅड. जाधव यांनी म्हटले. अॅड. उके यांच्या वकील पत्रावर मला त्यांची स्वाक्षरी हवी होती. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भेटायलाही दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. ईडीकडून सुरू असलेली अडवणूक आम्ही कोर्टासमोर मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले.
अॅड. उके यांचा भाऊ ताब्यात
ईडीने अॅड. सतीश उके यांना अटक केल्यानंतर आता उके यांचा भाऊ प्रदीप उके यांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीकडून त्यांनाही अटक होण्याची दाट शक्यता आहे.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर होते. 2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकही झाली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पोलिसांना शरण न आल्याने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत सतीश उकेंनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.