मुंबई: दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर धाडी टाकून त्यांची संपत्ती जप्त करण्याचा सपाट केंद्रीय यंत्रणांनी लावला आहे. याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन (Ishwarlal Jain) यांची तब्बल 315. 6 कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांनी जप्त केले आहे. त्या आधी पवारांच्या जवळच्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे पंधरा वर्षे खजिनदार असलेले आणि राज्यसभा सदस्य असलेले ईश्वरलाल शंकरलाल जैन आणि त्यांचा मुलगा मनीष जैन यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने धाडी टाकल्याचे पाहायला मिळालं होतं. या धाडी प्रामुख्याने महाराष्ट्रात जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या.
ईडीच्या वतीने टाकण्यात आलेल्या धाडीला आता एक महिना होत असतानाच आता ईश्वरलाल जैन यांची आर्थिक रसद बंद करण्याचा प्रयत्न ईडीच्या वतीने करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ईश्वरलाल जैन यांचे तब्बल 315 कोटींची चल आणि आचल संपत्तीने ईडीने जप्त केली आहे.
ईश्वरलाल जैन कोण आहेत?
- शरद पवार यांचे विश्वासू सहकारी..
- 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष.
- राज्यसभेचे माजी खासदार.
- मुलगा मनीष जैन माजी आमदार..राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख.
- जळगाव सह महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये देखील ज्वेलर्सचा व्यवसाय.
पीएमएलए कायद्यानुसार कारवाई
या संपूर्ण प्रकरणी ईडीच्या वतीने पत्रकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की शनिवारी पीएमएलए कायद्यानुसार (PMLA) राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand Jewelers), आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी असलेल्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. यामध्ये पवन चक्की, चांदी, हिरे, सोने आणि भारतीय मुद्रा अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
कारवाई करताना प्रामुख्याने ईडीच्या वतीने सांगण्यात आलं आहे की संबंधितांवर कारवाई करताना त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन यांनी बँकेत गहाण ठेवून जे पैसे घेतले होते ते पैसे इतर कामाला वापरले शिवाय बँकेत गहाण ठेवलेल्या जमिनींची देखील परस्पर विल्हेवाट लावली आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
जैन यांच्यावर कारवाई करताना कुठेतरी दिवसेंदिवस शरद पवार भाजप विरोधात होत असलेले आक्रमक आणि इंडियाची वाढणारी ताकद या बाबी डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांच्या निकटवर्तीयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून होत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण मागच्या काही दिवसात पवारांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली आहे.
शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर कारवाई
1) वाधवान बिल्डर (एचडीआयएल प्रकरण) मार्केटींग कंपनीची 88 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कार्यालयावर छापे आणि अटक.
2) दिवाण बिल्डर (डीएचएफएल प्रकरण) या प्रकरणात सतरा विविध बँकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून यामध्ये अविनाश भोसले आणि वादवान बंधू यांच्या कंपन्यांना पैसा दिल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले आणि वादवान हे दोघेही शरद पवारांचे निकटवर्ती आहेत.
3) अनिरुद्ध देशपांडे एमनोरा टाऊनशिप चे मालक आणि सिटी बँकेचे चेअरमन यांच्यावर ईडीची धाड. आर्थिक गैर व्यवहारातून या धाडी पडल्याची माहिती.
4) अविनाश भोसले डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयची कारवाई. भोसले यांचा एक हेलिकॉप्टर देखील ताब्यात.
5) नरेश गोयल- जेट एअरवेज 538 कोटी रुपयांच्या गतीत बँक फसवणुकी प्रकरणी ईडीची कारवाई. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी विरोधात मनी लॉन्ड्रिंग केस.
6) राणा कपूर येस बँकेचे अध्यक्ष असताना राणा कपूर यांनी डीएचएफएल, एचडीआयएल अबिल यासारख्या कंपन्यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले आणि त्या बदल्यात लाच घेतली. येस बँकेने तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि त्यापैकी वीस हजार कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. यासाठी देखील लाच घेतल्याचा आरोप आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या धाडी पाहता आगामी काळात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील किंबहुना इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवारांना देखील कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे आपापसातील मतभेद विसरून लवकरच इंडिया आघाडीची नागपूरमध्ये भव्य सभा पार पडणार आहे.
ही बातमी वाचा: