Shiv Sena News LIVE: नवीन चिन्हाबाबत चर्चा सुरू; संजय राऊत यांची माहिती
Shiv Sena Symbol LIVE Updates : निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
आमच्या चिन्हाची चोरी केली आहे. या चोरीचा म्होरक्या कोण आहे हे आम्ही शोधणार आहोत. लवकरच या चोरीच्या सरदाराबाबत खुलासा करणाार. याबरोबरच नवीन चिन्हाबाबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. पुढील आठवड्यात कार्यकारिणीची बैठकदेखील बोलवली जाणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत विविध ठराव मांडले जाणार आहेत.
भाजपकडून सध्या एक परसेप्शन क्रिएट करण्यात येत आहे. त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे आता ठाकरे गटामध्ये असणाऱ्या 15 आमदारांना व्हिपी लागू होईल. परंतु, असं होणार नाही, कारण अंधेरी पोट निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले आहेत. त्यामुळे आता व्हीप लागू होण्याचा प्रश्न नाही. मात्र तरी देखील भाजपच्या वतीने गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
उर्वरित शिवसैनिकांना जपण्यासाठी उद्धव ठाकरे आवेश पूर्ण भाषण करत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करायची हे शिवसैनिकांना फक्त दाखवण्यासाठी करत आहेत. त्यांच्या हातात फक्त कोकळत राहणं हेच बाकी आहे. याला गाडणार त्याला गाडणार, मात्र तुमच्याकडे गाडायला आहे कोण. दोघे समोरासमोर उभे रहा, बघा चोर कोण दिसतोय. सगळे वाईट मग तुम्ही घरात बसला होता ते चांगले का, यंत्रणांवर, संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांवर टीका केली जाते, आक्षेप घेतले जातात त्यामुळे सुमोटो दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. अशी भाषा वापरून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तुम्हाला न्याय मिळणार नाही, मग त्यांच्याकडे न्यायासाठी जाता कशाला. सर्व शाखा यांनी खरेदी केलेल्या नाहीत, शाखाप्रमुख पदाधिकारी आमच्या सोबत आले म्हणजे शाखा आमच्या होतील. महाराष्ट्रातील शिवसैनिक ठरवेल शिवसेना भवन कोणाच्या हातात द्यायचं, अशी टीका किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय.
पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रंचड राडा झाला. यावेळी दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला कार्यकर्त्या यावेळी प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.
पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे बाचाबाची झाली.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटामध्ये संतप्त भावना असून जालना येथे निवडणूक आयोगाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहरातील गांधी चौकात ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार निदर्शने करत निवडणूक आयोगाविरोधातला आपला संताप शिवसैनिकांनी आणि नेत्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगा विरोधात परभणीत उद्धव ठाकरे गटाने धिक्कार आंदोलन केले आहे. निवडणूक आयोग, भाजप, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. काल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. या विरोधात आज परभणीत उद्धव ठाकरे गटाचे आ. डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धिक्कार आंदोलन केले.
Shiv Sena : उद्धव ठाकरे केवळ भावनात्मक वातावरण तयार करत असतात. निशाणी चोरायचा विषय येत नाही, सर्वात जास्त खासदार आमदार हे आमच्या बाजूने आहेत. शिवसेनेला तुम्ही राष्ट्रवादीच्या ताटाखालचं मांजर बनवलं होतं. आतापर्यंत तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरून बुरखा घालून राष्ट्रवादीच्या मागे पुढे फिरत होता. तुम्ही काय मुखवटे घालून शिरलात लोक तुम्हाला जागा दाखवतील. एकनाथ शिंदे यांच्या मागे सर्व लोक उभे आहेत. दसरा मेळाव्यावेळी त्यांच्या बाजूने निर्णय लागला तेव्हा यांचा न्यायदेवतेवर विश्वास होता. परंतु आता न्याय देवतेच्या विरोधात बोलत आहेत, असा टोला शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी लगावला आहे.
Shiv Sena : ठाकरे गटाचे दहा आमदार आणि दोन खासदार फुटणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत पाचच आमदार राहणार असा दावा देखील तुमाने यांनी केला आहे.
Uddhav Thackeray LIVE: शिवधनुष्य चोरीला गेलं. या चोरांना आम्ही धडा शिकवणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला समोर या उद्धव ठाकरेंचं आव्हान.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं आज मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मातोश्रीबाहेर जात कलानगर सर्कलजवळ खुल्या कारमधून भाषण करत ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवश शिवधनुष्य चोरीला गेलंय. आता तेच शिवधनुष्य घेऊन निवडणुकाला सामोरे जा, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलंय.
आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू : उद्धव ठाकरे
गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही : उद्धव ठाकरे
धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो : उद्धव ठाकरे
लढाई आता सुरू झालीये : उद्धव ठाकरे
शिवधनुष्य चोरीला गेलंय : उद्धव ठाकरे
चोरांना निवडणुकीत गाडणार : उद्धव ठाकरे
कपट कारस्थानाचं राजकारण सुरूये : उद्धव ठाकरे
शिवसेना संपवता येणार नाही : उद्धव ठाकरे
मी खचलेलो नाही, खचणारही नाही : उद्धव ठाकरे
निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे
शिवधनुष्य चोरीला गेलंय : उद्धव ठाकरे
निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगानं जे मागितलं ते सर्व आम्ही दिलं. त्यांना असाच निकाल द्यायचा होता तर आम्हाला खटाटोप का करायला लावला? निवडणूक आयुक्तांनी एवढा थोतांडपणा का केला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
'लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार. ' असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Uddhav Thackeray: 'राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो. शिवसेना लेचीपेची नव्हती. चोराला चोरी पचणार नाही' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कोर्टातील निकालार्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देणं चुकीचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आले. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असलेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलं आहे की 16 आमदार अपात्र ठरतील. परंतु, न्यायालयाच्या निकाला आधीच हा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray: 'आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक. निवडणूक आयोगाचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे. काय बोलायचे हाच प्रश्न आहे, देशात बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे. देशात बेबंदशाही सुरु झाली हे पंतप्रधान मोदींनी जाहीर करावं.' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
आजचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. देशात बेबंदशाही सुरू झाली आहे हे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर करावं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना त्यांच्याच विचारांच्या लोकांना भेटली. तमाम शिवसैनिक आनंदी आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर निवडणूक आयोगाने शिक्का मोर्तब केलाय. ऑन मेरिट आमच्या बाजूला निकाल दिलाय. निवडणूक आयोगाचे खूप खूप आभार. ठाकरे गटाने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेब यांचे विचार सोडण्याचे पाप केले. काँग्रेस राष्ट्रवादी मुळे मातोश्री भंग पावली. बाळासाहेबांचं प्रकोप त्यांच्यावर कोसळला आहे.'
Rohit Pawar : 21 फेब्रुवारीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल. राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा जेंव्हा गुजरात आणि हरियाणा यांच्या निवडणुका एकत्रित होत्या, तेंव्हा पंतप्रधान मोदी साहेबांना दोन्हीकडे एकाचवेळी प्रचार करता येणार नव्हता. तेव्हा आयोगाने दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या, यावरूनच आयोग कोणाचं ऐकत हे लक्षात येतं. आत्ताच्या विधानसभा पोटनिवडणुकीवर कोणता ही फरक पडणार नाही. कारण 21 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे निलंबन केलं तर परिस्थिती काय राहील याचा विचार करा,अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
Sanjay Raut: संजय राऊत यांनी ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले', असं ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी लिहिलं.
Ashish Shelar: 'अखेर न्याय झाला, सत्याचा विजय झाला.. मराठी माणसाची शिवसेना वाचली रे वाचली...! मा. एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना गेली!' असं आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
Akola: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याचं सिलेब्रेशन अकोल्यात करण्यात आलंय. अकोल्यात शिंदे गटानं फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केलाय. शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात हा आनंद साजरा करण्यात आलंय. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं जिल्हा कार्यालय असलेल्या गांधीचौकात हा आनंद साजरा करण्यात आलाय.
आज मिळालेला ऐतिहासिक निकाल हा पंढरीचा पांडुरंग आणि स्वर्गातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिलेला आशीर्वाद आहे अशा शब्दात आमदार शहाजीबापू पाटील यांनी या निकालाचे स्वागत केले. निकालाची माहिती काळातच संघर्षच्या प्रत्येक पावलावर सोबत असणाऱ्या शहाजीबापू पाटील यांच्या डोळ्यात पाणी आले. आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने मुख्यमंत्र्यांच्या सोबत असल्याने हा निकाल महाराष्ट्रातील शिवसैनिकांना नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. आता महाराष्ट्र भगवामय होणार असा दावा आमदार शहाजीबापू यांनी केला. या निकालाने राष्ट्रवादीच्या पोटात पोटशूळ उठल्याचे सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवरून दिसत असल्याचा टोलाही बापूंनी लगावला. गेल्या सहा महिन्यापासून वारंवार सांगत होतो या संजय राऊतांचे काय सुद्धा ऐकू नका, लबाड थोबाड करून महाराष्ट्र गढूळ करायचे काम तो करतोय असा घणाघात देखील शहाजीबापू यांनी केला.
Raj Thackeray: शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकू येत आहे. 'बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.' असं या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.
Devendra Fadnavis: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलतील? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया लोकशाहीत बहुमताला महत्व असतं. शिवसेना हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळालं. खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Politics : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत.
शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.
आम्ही लोकांमध्ये जाणार असून लोकांमधून पुन्हा एकदा शिवसेना उभी करणार असल्याचा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि नवीन निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाऊ असेही राऊत यांनी म्हटले.
Shiv Sena Symbol LIVE Updates : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.
लोकशाहीत बहुमताला महत्व असतं. शिवसेना हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळालं. खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. या निकालाच्या माध्यामातून निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आज सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. 'आजचा हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि लोकशाहीचा आहे. याबरोबरच हा विजय सत्याचा आहे. आम्ही संघर्ष केला, आजचा विजय म्हणजे त्यातंच प्रतिक आहे , असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -