कोल्हापूर : कोयना धरण परिसरासह कोकण किनारपट्टी, दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र शनिवारी रात्री झालेल्या भुकंपाच्या जोरदार धक्कयाने हादरला आहे. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल नोंदली गेली. या जोरदार धक्कयानंतर कोयना परिसरात पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांना शनिवारी मध्यरात्री भूकंपाच्या मध्यम स्वरूपाच्या धक्क्याने हादरवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.8 इतकी नोंदली गेली आहे. मध्यरात्री 11 वाजून 44 मिनिटे आणि 52 सेकंदांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाचा केंद्रबिंदू सांगलीपासून पश्चिमेला 84 किलोमीटर आणि राजगडपासून दक्षिणेकडे 133 किलोमीटरवर कोयना धरणाच्या परिसरात असल्याचं सांगण्यात येत आहे.
या भूकंपाचे धक्के प्रामुख्यानं सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत जाणवले. भूकंपामुळे काहीकाळ रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमधून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली.
या भूकंपामुळे कुठली जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून केली जात आहे.