अकोला  : पुण्यातील ड्रग्जप्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं असून पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई सुरू केली आहे. पुण्याच्या (Pune) एफसी रोडवरील एका बारमधील तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंना लक्ष्य केले. त्यानंतर, आमदार रविंद्र धंगेकरांनीही पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा हफ्ताखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे, पुणे शहरातील गुन्हेगारी आणि वाढती पब संस्कृती, अंमली पदार्थांचा वापर आणि बदललेला नवा पॅटर्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यावरुन, विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. पुण्यातील व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित बार सील केला आहे. मात्र, आता राजकीय नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवल्याचं दिसून आलं. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या काळात असं घडलं नाही, असे म्हणत सध्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बोट दाखवले होते. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहोचतात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तर सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करताना मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर, आधी भुजबळ आणि आता अमो मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.   


चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेवर आमदार अमोल मिटकरी यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटलांवर आमदार अमोल मिटकरींनी गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांतदादांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात पुण्यात अंमली पदार्थ, डान्स बार, पब्स, हप्ता वसुलीला उधाण आलं होतं, असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला आहे. पालकमंत्री असताना पुण्यातील अवैध धंद्यांना चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने समर्थन करत असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच, अजितदादांनी या सर्व गोष्टींना समर्थन न केल्यामुळे आज हे प्रकार उघड होत असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. 


महायुतीत तणाव होण्याची शक्यता


अमोल मिटकरींच्या या आरोपानंतर आता महायुतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, आधीच लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत अजित पवार गट वेगळा पडल्याचं चित्र आहे, त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांना महायुतीमध्ये अजित पवार नको, असाही सूर काही नेत्यांकडून उमटला आहे. त्यामुळे, महायुतीतील बिघाडीत आणि बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरींनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र आल्यास राज्यात वेगळं चित्र पाहायला मिळेल, असे म्हटले होते. त्यानंतर, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सारवासारवही केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मिटकरी यांनी म्हटलं होतं. 


छगन भुजबळ यांनीही लगावला टोला


मी पालकमंत्री होतो, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा असे घडत नव्हते असे म्हणून कसे चालेल? प्रत्येकाच्या कार्यकाळात गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम सुरू असते. काही गोष्टी उजेडात येतात, तेव्हा त्याला महत्व प्राप्त होतं. समोरच्या विरोधकांनी बोलले तर ठीक आहे. पण, बरोबरच्या लोकांनी बोललं तर कसे चालेल, असा टोला छगन भुजबळ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.