अजानसाठी आदित्य ठाकरेंनी थांबवले खासदार प्रतापराव जाधव यांचे भाषण
एबीपी माझा वेब टीम | 19 Nov 2018 07:07 PM (IST)
आदित्य ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत वाटप करण्यासाठी आले होते.
बुलढाणा : खासदार प्रतापराव जाधव यांच्या भाषणादरम्यान अजान सूरु झाल्याने, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी त्याना थांबवल्याचा प्रसंग मेहकरमधील एका कार्यक्रमात घडला आहे. आदित्य ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत वाटप करण्यासाठी आले होते. जाहीर सभा आणि मदत वाटपाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी खासदार प्रतापराव जाधव कार्यक्रमाच प्रास्ताविक करत होते. त्यावेळी अचानक अजान सुरु झाली, मात्र खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रास्ताविक भाषण सुरूच होते. एकीकडे अजान आणि दुसरीकडे भाषण असे चित्र असताना, आदित्य ठाकरे यांनी प्रतापराव जाधव यांना भाषण थांबवण्यास सांगितले. अजान संपेपर्यंत प्रतापरावांनी आपलं थांबवले. अजान संपल्यानतंर प्रताप राव जाधव यांचे भाषण पुन्हा सुरू झाले. हा प्रसंग अगदी काही मिनिटाचाच होता, मात्र बरेच काही सांगून गेला.