रत्नागिरी : रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये मोबाईल बाजारात धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मोबाईल कंपन्यांचे बनावट साहित्य ग्राहकांच्या माथी मारले जात आहे.


रत्नागिरी आणि चिपळूण या दोन शहरांमधील मोबाईल बाजारात बनावट साहित्य विक्री होत असल्याच्या तक्रारी इन्टेक्स कंपनीतील अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत रत्नागिरीच्या आठवडा बाजार परिसरातल्या मार्केटमध्ये काही दुकानात इन्टेक्स कंपनीच्या नावावर बनावट साहित्यांची विक्री होत असल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात  दिली होती.

इन्टेक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई सुरु केली. आठवडा बाजार परिसरातल्या तीन दुकानात  पाहणी केली. बाजारपेठेतील तीन दुकानांमध्ये इन्टेक्स कंपनीच्या नावावर बनावट साहित्य विक्री करत असल्याचे आढळून आले.

शहरातील आठवडा बाजार परिसरातल्या खेतेश्वर मोबाईल, महालक्ष्मी मोबाईल आणि नागनेशी मोबाईल या तीन दुकानांमध्ये 1 लाख 65 हजारांची इन्टेक्स कंपनीची बनावट साहित्य आढळून आली. दुकानात केलेल्या तपासणीत मोबाईल बॅटरीचे 18 नग, इन्टेक्स बॅटरीचे 15 नग, 109 फ्लिप कव्हर असं साहित्य जप्त करण्यात आलं.

या प्रकरणी दुकान मालक बगतराम पुरोहित, हसरनराम पुरोहित आणि महेंद्रसिंग राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.