मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड घाटात एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडे नऊ वाजेच्यादरम्यान मालेगाव येथून नाशिक येथे सुरेखा शांताराम बर्डे या रुग्णाला घेऊन ही रुग्णवाहिका मालेगाव येथून निघाली होती.

या रुग्णासोबत पाच जण होते त्यात एक पोलीस कर्मचारी होता. राहूड घाटात रुग्णवाहिकेला अचानक आग लागली, त्यामुळे तातडीने सर्व जण त्यातून बाहेर पडले. त्याच वेळी गाडीतील दोन ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठे स्फोट झाले. मात्र गाडीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने याची माहिती चांदवड पोलिस स्टोशनला देत दुसरी रुग्णवाहिका बोलवून घेतली आणि रुग्णाला पुढे पाठविले.

या घटनेमुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.आग विझविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनकर कोतवाल यांनी तातडीने पाण्याचे टँकर पाठवले आणि सोमा टोल कंपनीचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका जळून खाक झाली होती. सध्या घटनास्थळावरुन रुग्णवाहिका बाजूला घेण्याचे काम सुरु असून,वाहतूक सेवा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.