पंढरपूर : राष्ट्रवादीला रामराम ठोकत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असतानाच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चिन्हं आहेत. धवलसिंह यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.


धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार राज्यमंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र. अकलूज परिसरात मोठी ताकद असलेला युवा नेता म्हणून धवलसिंह यांची ओळख आहे. सदाशिवनगर भागातील शंकर सह साखर कारखान्याचं अध्यक्षपद त्यांनी दहा वर्ष भूषवलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह मोहितेंनी त्यांना पराभूत करुन कारखाना जिंकला होता.
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये धवलसिंहांनी सदस्य म्हणून काम केलं असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मोहिते-पाटील परिवार भाजपमय झाला असताना धवलसिंह आणि पवार यांच्या भेटीने राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झालं आहे.

 VIDEO | रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशानंतर सत्यप्रभादेवी मोहितेंची पहिली प्रतिक्रिया



मुंबईत आज तासभर बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी दुपारी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली असून डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांनीही याला दुजोरा दिला आहे.