मुंबई : दिवाळी (Diwali) आणि त्यानंतर शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे चाकरमानी देवदर्शनासाठी बाहेर पडले आहेत. राज्यभरातील मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू आहे. पंढरपूर, कोल्हापूर,  तुळजापूर, शिर्डीसह अनेक ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. 


तुळजापूरात तुफान गर्दी 
तुळजापूरात शुक्रवारी भाविकांची तुफान गर्दी उसळली होती.  मंदिर, दर्शन मंडप आणि रस्ते भाविकांनी फुल्ल झाले होते. तर वाहनतळं देखील वाहनांनी भरुन गेली होती. तुळजाभवानी मंदीर पहाटे 1 वाजता खुले करुन देखील भाविकांना दर्शनासाठी वेळ लागत होता.


भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अँक्सेस झिरो दर्शन पास बंद करुन भाविकांना मंदिरात थेट दर्शनासाठी सोडले जात होते.  सकाळी सहा वाजता पाचमजली दर्शन मंडप भरुन होम कुंडापर्यत भाविकांची रांग बाहेर आली होती. दोन्ही महाद्वार समोर प्रचंड अतिक्रमणे असल्याने येथे भाविकांना दर्शन करुन ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. महाद्वार समोर किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात ठान मांडले होते. तर महाद्वार समोर चार ते पाच हजार नारळ फोडले गेल्याने सर्वत्र चिखल झाला होता. देवीदर्नशनानंतर भाविकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. तुळजापूर येथे स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी असल्याने याचा महिला भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला.  


साई बाबांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा


शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सलग सुट्ट्यांमुळे साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून भक्तमंडळी शिर्डीला आले होते. 


अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 


करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनालाही सकाळपासूनच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातूनही भाविक कोल्हापुरात पोहोचलेत होते. लहाण मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक भक्त अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूला आले होते. भाविकांच्या सोयीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने योग्य नियोजन केलं होतं. 


विठूरायाच्या दर्शानासाठी मोठी गर्दी
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली  आहे. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे आज पंढरपुरात भाविकांनी गर्दी केली होती. 24 तास मंदिर सुरू असल्यामुळे भाविकांना मनसोक्त सावळ्या विठूरायाचे दर्शन घेता आले. दरम्यान, आज सकाळी अकरा वाजता  विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहेत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते.  


शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात भक्तांची मांदियाळी 


शेगावमधील संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली दिवाळीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील लाखो भाविक शेगावात दाखल झाले. त्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 


सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
नाशिकच्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवाळी उत्सवादरम्यान भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन गडावरील श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर  27 ऑक्टोबरपासून येत्या 13 नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहे. त्यामुळे आज दिवसभरात लाखो भाविकांनी सप्तशृंगीचे दर्शन घेतले.