Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रिधोरा धरणा जवळच असलेल्या घोगरा धबधब्यामध्ये बुडून ( Drowning In Waterfall ) दोघांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. सौरभ भावरकर (वय, 30 रा. वर्धा ) आणि विकास नवघरे (वय, 34 रा. वर्धा ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. उत्तरीय तपासणीसाठी सेलू पोलिसांनी दोघांचेही मृतदेह सेलू ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.  गेल्या तीन दिवसातून ही दुसरी घटना घडली आहे. 26 ऑक्टोबर रोजी देखील एका 17  वर्षाच्या तरुणाचा याच ठिकाणी बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. तीन दिवसांमध्ये तीन तरूणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


मृत दोघेही युवक आपल्या मित्रांसोबत रिधोरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यातील एकाला रिधोरा धरणाजवळ असलेल्या घोगरा धबधब्यात पोहोण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला प्रसंग बघून इतर मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी त्यातील एक जण  त्याला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 


सुरक्षा फलक नसल्याने दुर्घटनांची मालिका 
घोगरा धबधबा परिसरात सुरक्षा फलक नाही. त्यामुळे या ठिकाणी सतत दुर्घटना घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. घोगरा धबधब्याच्या पाण्यात भोवरा असून भोवऱ्यात उतरण्याचे धाडस अनेक तरुण करतात. मात्र हे जीवघेणे ठरत असून येथे येणाऱ्यांनी याबाबतची काळजी घेतली पाहिजे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. शिवाय संबंधित प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा इशारा देणारे फलक लावण्याची ही गरज असल्याचे देखील स्थानिकांचे मत आहे. 


तीन दिवसातली दुसरी घटना
 26 ऑक्टोबर रोजी एका 17 वर्षीय तरुणाचा याच घोगरा धरणात बुडून मृत्यू झाला होता. ऐन भाऊबीजेच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली होती. त्यामुळे तीन दिवसात दोन दुर्दैवी घटना घडली असल्याने त्या ठिकाणी सुरक्षा इशारा फलक लावण्याची मागणी जोर धरत असून प्रशासनाने त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. 


महत्वाच्या बातम्या


अवघ्या तीन महिन्यात चार मोठे प्रोजेक्ट गमावले, 1.80 लाख कोटींचा फटका, लाखोंचा रोजगारही बुडाला