सांगली : यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पेरणीच्या काळातच शेतकरी संपावर गेला तर शेतकऱ्यांचंच नुकसान होईल. पिंक चांगली आली पाहिजेत. त्यामुळे आताच्या घडीला शेतकरी संप किंवा आंदोलनाची गरज नाही, असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.


राज्यातील शेतकरी आजपासून पुन्हा 10 दिवस संपावर जात आहेत. राष्ट्रीय किसान महासंघानं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी आजपासून 10 जूनपर्यंत संपावर असतील. या 10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही शेतमाल विक्रीसाठी काढणार नाहीत.

या शेतकरी संपामध्ये विविध संघटनांचा सहभाग असला तरी त्यामध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग नाही. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सद्यपरिस्थितीत शेतकऱ्यांनाच संपाचा फटका बसणार आहे, असं ते म्हणाले.

''आता आंदोलन करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय राज्यपालांना भेटून विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती करणार आहोत. यंदा पाऊस चांगला होणार आहे. शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे दूध, शेतीमाल रोखून धरण्यापेक्षा सरकार दरबारी व्यथा मांडाव्यात,'' असं राजू शेट्टी म्हणाले.