उस्मानाबाद : पावसाळा सुरु होताच जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात राज्यात पावसाने दमदार एंट्री केली. सलग पावसामुळे पेरण्याही झाल्या. त्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली.  गेल्या 20 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.


सोयाबीन पीक फुलोऱ्यात आले असून मूग, उडीद पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. पावसाच्या दडीमुळे पिके कोमेजू लागली आहेत. आणखी आठवडाभर पावसाने हजेरी न लावल्यास सोयाबीन, उडीद, मूग पिके वाया जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झालाय. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पेरणीचे क्षेत्र 2.51 लाख हेक्टरने घटले.

राज्यात आतापर्यंत एक कोटी 20 लाख 60 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र त्यातले 43 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. तसा अहवाल कृषी विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे.