सांगली : सांगली महापालिकेच्या निवडणुकीत काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव हा भाजपमुळे नाही तर बंडखोरांमुळे झाला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या निवडणुकीत बंडखोरांना अनपेक्षित मतं मिळली आहेत. बंडखोरांना एवढी जास्त मतं कशी पडली हा संशोधनाचा विषय आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेतील पराभवावर प्रतिक्रिया दिली.


विजयी उमेदवारांची यादी

सांगली महापालिका निवडणुकीत 66 टक्के नागरिकांनी भाजपला नाकारलं आहे. पाच लाख मतं आघाडी आणि बंडखोरांना मिळाली तर तीन लाख मते भाजपला मिळाली आहे. आम्ही इव्हीएमवर अजून आक्षेप घेतला नव्हता, तोपर्यंत निवडून आलेल्यांनीच ईव्हीएमचं नाव घेतलं. आम्ही आरोप करण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील यांना ईव्हीएमची आठवण कशी झाली. चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी आमचे 42 उमेदवार जिंकण्याचा केलेला दावा इतका तंतोतंत खरा कसा काय ठरु शकतो, असंही जयंत पाटील म्हणाले.

शहरातील बऱ्याच प्रभागातील नागरिक या निवडणुकीतील निकाल मान्य करत नाहीत, अशी परिस्थिती आहे. विधानसभेपर्यंत कॉंग्रेसमुक्त सांगली करु, असं भाजपचे मंत्री म्हणाले. पण आमच्या आघाडीची मतं जास्त आहेत, याची नोंद भाजपने घ्यावी असं पाटील म्हणाले. आम्ही आमचा पराभव मान्य करतो, शहरातील चांगल्या कल्पना राबवल्या पाहिजेत, यासाठी आमच्या आघाडीतील नगरसेवव आग्रही असतील, असंही जयंत पाटील म्हणाले.

सांगली महापालिका निकाल (एकूण 78 जागा)
भाजप : 41
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी : 35
स्वाभिमानी विकास आघाडी : 1
अपक्ष : 1
शिवसेना : 0