मुंबई/अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. अमरावती शिवसेनेमधील वाद मिटणार की वाढणार हे या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.


शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारीमुळेच झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे अभिजीत अडसूळ यांनी ही तक्रार केली आहे. नवनीत कौर राणा यांचा विजय आणि आभार रॅलीमधील माजी खासदार अनंतराव गुढे यांच्या पत्नीने खासदार नवनीत राणांचा सत्कार केला होता, तसंच शुभेच्छाही दिल्या होत्या. या सगळ्याचे व्हिडिओ आणि फोटो मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी मातोश्रीवर बेठक बोलावली आहे. या बेठकीला अनंतराव गुढे यांनाही तातडीनं बोलवण्यात आलं आहे

याप्रकरणी एबीपी माझाने अनंतराव गुढे यांच्याशी बातचित केली. यावेळी गुढे म्हणाले की, मी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडले. शिवसेना माझी आई आहे आणि मातोश्री हे मंदिर आहे. मी गद्दारी केलेली नाही. तो व्हिडीओ निवडणुकीपूर्वीचा आहे. त्या व्हिडिओमुळे कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो.

शिवसेना नेते अनिल देसाई याबाबत म्हणाले की, अडसूळ आणि गुढे यांच्यातील संघटनात्मक वाद आता मिटला आहे. असे वाद मिटवण्यासाठी पक्षप्रमुख सक्षम आहेत.