मुंबई : येत्या वीकेंडला कोकणात जाऊन 'चिल' करण्याच्या योजना आखणाऱ्या मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागात सलग तीन दिवस ड्राय डे असणार आहे.
विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगत भागात येत्या वीकेंडला म्हणजे शनिवार 23 जूनपासून रविवार 25 जूनपर्यंत 'ड्राय डे' घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येता वीकेंड 'कोरडा'च जाईल.
25 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक आहे. मुंबईत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 25 जूनला मतदान होणार आहे. कोकणात पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे, तर नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोग प्रमुखांनी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जिल्हाधिकाऱ्यांना मतदानाच्या 48 तास आधी दारुविक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही दारुबंदी लागू असेल.
महाराष्ट्रात वर्षाला एकूण नऊ ड्राय डे असतात, मात्र कोणत्याही सार्वत्रिक निवडणूक किंवा विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान दारुविक्रीवर बंदी आणण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. कायद्यानुसार ही बंदी 48 तासांसाठी लागू असते.