नाशिक पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित परिसरात ड्रोन उडवल्याने खळबळ
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2018 04:17 PM (IST)
सुरक्षेच्या कारणावरुन संवेदनशील परिसरात ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आले आहे. मात्र तरीही त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (PTC) येथे शुक्रवारी 5 ते 10 मिनिटे ड्रोन उडवण्यात आले.
नाशिक : नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्र परिसरात अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणावरुन संवेदनशील परिसरात ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आले आहे. मात्र तरीही त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (PTC) येथे शुक्रवारी 5 ते 10 मिनिटे ड्रोन उडवण्यात आले. पोलीस अकादमी संवेदनशील परिसर असल्याने ड्रोन उडविण्याचा उद्देश काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. गंगापूर पोलीस ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र म्हणून या केंद्राची ओळख आहे. यापूर्वी बिलाल शेख या संशयित दहशतवादीने देखील या पोलीस प्रशिक्षण केंद्राची रेकी केल्याचे कालांतराने उघडकीस आले होते.