Pradip Kurulkar : DRDOचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ता सोबत अनेक अॅपच्या माध्यमातून चॅटिंग केल्याचं आणि त्या चॅटिंगमध्ये कुरुलकर झारा दास गुप्ताचा उल्लेख 'बेब' असा करत असल्याच समोर आलं आहे. या चॅटिंगद्वारे कुरुलकरने भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचं स्पष्ट झालं आहे. 


DRDO चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी झारा दासगुप्ताशी व्हॉटस्अप, इन्स्ट्राग्रामवरुन संपर्कात होते, असं दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून समोर आले आहे. इतकंच नव्हे तर कुरुलकर यांनी वेगवेगळ्या सोशल ॲप्सचा वापर करून संवेदनशील माहिती दिली. कुरुलकर आणि झारा दासगुप्ता हे दोघे ही व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात होते. त्यासोबतच ते "बिंग चॅट" आणि "क्लाऊड चॅट" या  अॅपवरून बोलत होते. त्यांच्यामधील झालेले संभाषण समोर आले आहे. पहिल्या चॅटमध्ये कुरुलकरने झाराला टू एअर मिसाईल (एसएएम) याबद्दल माहिती दिली, तर दुसऱ्या चॅटमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राबद्दल माहिती दिली आहे. 


गुरु-शिष्य ते 'बेब'पर्यंतचा प्रवास...


एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि एक विद्यार्थी म्हणून प्रदीप कुरुलकर आणि झारा दासगुप्ता यांच्यात संभाषण सुरु झाले. पण पुढे हे नातं बदलत गेलं. अतिशय खाजगी स्वरूपाच ते बनलं आणि कुरुलकर झारा दासगुप्ताचा 'बेब' असा उल्लेख करायला लागले. यातून दोघांमधील नातं कसं होतं हे स्पष्ट होतं. पण या जवळकीचा उपयोग करुन भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती मिळवण्याचा झारा दासगुप्ताचा प्रयत्न होता.


कोणती माहिती दिली?


संरक्षण प्रकल्पात वापरण्यात आलेल्या साहित्याची रचना, गुजरात संरक्षण कार्यक्रमात दाखविण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आकाश लाँचरची माहिती, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये काय काय आहे, अशी संवेदनशील माहिती कुरुलकर झाराला देत होते. त्याचबरोबर रोबोट्स बनविणाऱ्या एका कंपनीच्या सीईओ कोण आहे?, संस्थांमध्ये नवीन नियुक्त्या कोणत्या झाल्यात देखील सांगत होते. डीआरडीओशी संबंधित अनेक लोकांची तसेच ड्युटी चार्ट पाकिस्तानपर्यंत पोहचला होता. 


रोजचे अपडेट्स देत होते कुरुलकर...


डीआरडीओच्या दिघी इथल्या कॅम्पसमधे मागील वर्षी बिबट्या घुसला होता. प्रदीप कुरुलकर यांनी उत्साहाच्या भरात त्याचीही माहिती झाराला दिली. बेब आणि हनी असं या दोघांमधील नातं फुलत गेलं आणि भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती पाकिस्तानपर्यंत पोहतच गेली आणि म्हणूनच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कुरुलकर प्रकरणात गांभिर्याने तपास सुरु केला आहे.