अमरावती : मुळचे अमरावती शहरातील रहिवासी आणि सध्या स्कॉटलँड येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांच्या यशाने राज्यासह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील रहिवासी प्रकाश गुल्हाणे यांना सहा बहिणी आहेत. त्यांची एक बहिण इंजिनिअरिंग झाल्यावर प्रकाश यांना अमरावतीवरून लंडनला घेऊन गेली. 1975 साली लंडन येथे गेल्यानंतर डॉ. संदेश यांच्या वडिलांना एक खाजगी नोकरी मिळाली. चांगली नोकरी मिळाल्यामुळे प्रकाश गुल्हाणे यांनी लंडनमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लग्न केलं त्यांचा एकुलता एक मुलगा डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांचाही जन्म लंडनमध्येच झाला. 



संदेश हा लहानपणी अमरावती जिल्ह्यात आपल्या वडिलांसोबत अनेकदा यायचे. दिवाळी सारख्या सणाला ते हमखास आपल्या गावी अमरावती यायचे. त्यानंतर संदेश यांच मेडिकलच शिक्षण पूर्ण झालं आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले संदेश गुल्हाणे यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम सुरु केलं. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. 2021 मध्ये डॉ. संदेश यांना स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली.


दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावतीकरांसाठीही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे हे स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :