पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा केली आहे. प्र-कुलगुरूपदासाठी मागील अनेक दिवसांपासून दिग्गज प्रयत्न करत होते. मात्र शेवट डॉ. पराग काळकर यांनी बाजी मारली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू म्हणून कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ.संजय चाकणे यांची नावं प्र-कुलगुरूपदासाठी चर्चेत होती. त्यामुळेच या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागते, हे पाहणं महत्त्वाचं होतं. मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्यादेखील नावाची चर्चा होती.
त्यामुळे प्र-कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आलं होतं. गेल्या महिन्यात मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाव मागे पडलं. त्यानंतर डॉ. पराग काळकर यांची प्र - कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत डॉ. पराग काळकर?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. पराग काळकर हे काम पाहत आहे. कुलगुरु पदासाठीदेखील त्यांची चर्चा सुरु होती. ते पहिल्या पाच उमेदवारांमध्येदेखील होते. मात्र त्यांना आता प्र-कलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
स्टुडंट हेल्पींग हँडस अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांचा आक्षेप
त्याच्या या निवडीवर किंवा नियुक्तीवर मात्र स्टुडंट हेल्पींग हँडस अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी आक्षेप घेतला आहे. प्र-कुलगूरुपदी पराग काळकर या गुन्हेगार व्यक्तीची निवडविद्यापीठानी राजकीय दबावातून निर्णय घेतला का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्या नियुक्तीला विरोधा केला आहे. त्यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत.
फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
'आज विद्यापीठाच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडली असे म्हणावं लागेल. त्यांच्या आजपर्यतच्या परंपरेला आणि प्रतिष्ठेला मोठे गालबोट लागले आहे. डॉ.पराग काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे डीन होते. 2017 ते18 या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हा केला होता. पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यात IPC 406,409,420 असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यांवर दाखल आहेत. असं असताना कुलगुरु आणि व्यवस्थापण परीषदेने त्यांची निवड केली कशी?कोणी सांगितले त्यांना हे गुन्हे असताना नियुक्ती करायला? कुठल्या नैतिकतेत बसतं हे? ही अत्यंत शरमेची बाब आहे.निवडीसाठी ठिकभर लोक होतेच ना. त्यांना संधी द्यायची.सध्या विद्यापीठाची वाटचाल कुठे चाललीय? रसातळास घेऊन जाता काय? देशभर ज्या विद्यापीठाचा डंका संशोधन आणि गुणवत्तेमुळे आहे. या विद्यापीठात अशा व्यक्तीची नियुक्ती करणे अत्यंत घातक आहे. एकंदरीत ही प्र-कुलगूरु निवड प्रक्रिया उशीरा राबवण्याचे कारण एकच होते. मोठ्या रक्कमेची ठरलेली डिल कुलगूरु पदासाठी आधीच दिली होती. ती प्र-कुलगूरु पदावरती त्यांनी समाधान मानावे. यासाठी त्यांच्या राजकीय वरदहस्तांनी इच्छा पुर्ण केली. यासाठी आम्ही राज्यापालास भेटून सर्व बाबी पुरावेनिशी सांगणार आहोत. नियुक्त रध्द करावी.अशी मागणी करणार आहोत', असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.