मुंबई: सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या कट्टर संस्था या समाजासाठी घातक असल्याचा दावा सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे याच्या जामीनाला विरोध करत केंद्रीय तपासयंत्रणेनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. हिंदू विरोधी विचारसरणीच्या लोकांना हे कट्टरतावादी शत्रू समान मानून त्यांचा खातमा करणं हाच त्यावरचा उपाय मानतात असंही सीबीआयनं यात म्हटलेलं आहे. वीरेंद्र तावडेंच्या जामीनाकरता दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात लवकरच सुनावणी पार पडणार आहे.


पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदीराजवळ हत्या करण्यात आली होती. रोजच्याप्रामणे मॉर्निंग वॉक करत असताना त्या दरम्यानच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे हा या कटाचा मास्टरमाइंड असून त्यानंच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या हल्लेखोरांना तिथं आणलं होतं असा आरोप सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात ठेवला आहे. 


कट्टरतावादी लोकांना विरोध केल्याच्या कारणामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या घडविण्यात आली, असा दावाही सीबीआयनं यात केलेला आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी गुंतलेले असल्यानं या सर्व हत्या एका कटाचा भाग आहेत असंही केंद्रीय तपासयंत्रणेनं स्पष्ट केलं आहे. वीरेंद्र तावडेला याप्रकरणी तपासयंत्रणेनं साल 2016 मध्ये अटक केली होती.


वीरेंद्र तावडेनं मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. याला विरोध करत सीबीआयनं नुकतंच आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. तावडे हा समाजात तणाव निर्माण करणा-या कट्टर संस्थांसाठी करतो, त्यामुळे त्याला जामीन मंजूर केल्यास समाजात तणाव निर्माण होऊन समाजातील एकात्मतेला धोका पोहचू शकेल, असंही सीबीआयनं यात म्हटलेलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha