सांगली : चिमुकल्या कळ्यांना नख लावण्याचं काम करणाऱ्या डॉ.बाबासो खिद्रापुरेला रात्री बेळगावमधून अटक करण्यात आली. त्याला आज कोर्टासमोर हजर केलं असता त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


सांगलीजवळच्या म्हैसाळ गावात बाबासो खिद्रापुरे गर्भपात करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. खिद्रापुरेला अटक करण्यासाठी सांगली पोलिसांची 5 पथकं रवाना झाली होती. बेळगावमध्ये रात्री उशिरा सांगली पोलिसांनी खिद्रापुरेवर कारवाई केली.

काय आहे प्रकरण?

सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासो खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं.

स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भकं सापडली.

बाबासो खिद्रापुरे बीएचएमएस असून मूळचा शिरोळ मधील नरवाडचा रहिवासी आहे. मागील 10 वर्षांपासून त्याचं म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीनं गर्भपात करत असल्याचा आरोप आहे. या व्यवसायात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :


सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा बोगस डॉक्टर खिद्रापुरेला बेड्या


सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा नराधम डॉ. खिद्रापुरेचा शोध सुरु