औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजनेत कौशल्यानुसार काम देणार आणि विद्यार्थ्यांनी मागितलं तरच खुरपणीचं काम देणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु अशोक तेजनकर यांनी दिली. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून एम.ए, एम.फिल आणि पी.एच.डीच्या विद्यार्थांना खुरपणीचं काम दिलं जात असल्याची बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रसारित झाली होती. त्यानंतर अनेकांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली.
त्यापार्श्वभूमीवर बोलताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणाले की, ज्या विद्यार्थ्याला डीटीपी येतं त्यांना डीटीपीचं काम देण्यात येईल, ज्यांना झेरॉक्स मशिन चालवता येतं, त्यांना झेरॉक्सचं काम दिलं जाईल तर, ज्या विद्यार्थ्यांना पाकिटे आणि फाईल बनवता येतात, त्यांना संबंधित काम देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यानी मागितलं तरच खुरपणीचं काम देण्यात येईल.
काय आहे प्रकरण ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 'कमवा आणि शिका' योजनेचा एक अजब कारभार पहायला मिळाला. विद्यापीठाने एमफिल, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात खुरपं दिलं. या विद्यार्थ्यांकडून आमराई खुरपून घेतली जाते. मराठवाड्याच्या गावागावातून उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेल्या गोरगरीब मुलं-मुलींकडून खुरपणीचं काम करून घेतलं जातं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाड्यातील गोरगरीब विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात. घरच्या गरीबीमुळे पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेत काम करुन शिकतात. गावात आई-वडील इतरांच्या शेतात खुरपणी करतात. त्यांच्या हातातील खुरपं काढण्याची स्वप्न उराशी बाळगून उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या या विद्यार्थ्यांच्या हाती इथल्या विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा खुरपं दिल्याचं पाहायला मिळालं.
1978-79 ला 'बामु'मध्ये कमवा आणि शिका योजना सुरु झाली. या योजनेत खरंतर मुला-मुलींना कुशल काम देणं गरजेचं आहे, मात्र इथे विद्यापीठ आमराईतलं गवत काढायला लावतं.
खरंतर आता या मुलींची परीक्षा आहे. खुरपणीमुळे अनेकांच्या हातांना जखमा झाल्यात, अशा जखमा घेऊन या मुली परीक्षा देतात आणि विद्यापीठ महिन्याकाठी कमवा शिकवा योजनेअंतर्गत मुलींच्या हाती 1900 रुपये देतं.
विद्यार्थ्यांना कौशल्यानुसार काम देणार : प्र-कुलगुरु 'बामु'
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
30 Oct 2018 02:40 PM (IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 'कमवा आणि शिका' योजनेचा एक अजब कारभार पहायला मिळाला. विद्यापीठाने एमफिल, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात खुरपं दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -