Nagpur News: नागपुरातील (Nagpur News) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) धावपट्टीला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे रनवेवरील दिवे बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी, त्याच्या फटका विमान वाहतुकीला बसला असून सुमारे दोन तास विमानांचे लँडिंग आणि टेक ऑर्फ पूर्णपणे ठप्प झाले होते. ही घटना शुक्रवारच्या संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. त्यामुळे जवळ जवळ 25 हून अधिक विमानांचे वेळापत्रक या प्रकारामुळे बिघडले असून त्यांचा फटका प्रवाश्यांना बसला. त्यानंतर सुमारे दोन तासाहून अधिक वेळ अथक परिश्रम घेतल्यानंतर अखेर विमान वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. मात्र तो पर्यंत प्रवाश्यांच्या रोषाचा सामना नागपूर विमानतळ प्रशासनाला करावा लागलाय. 


25 हून आधिक विमाने लेट


नागपूर शहरात (Nagpur News) गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह दमदार अवकाळी पावसाची सततधार सुरू आहे. त्याचा फटका आता विमान वाहतुकीला देखील बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी 6. 30 वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळाच्या धावपट्टीला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये अचानक बिघाड झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे विमानतळावरील विमान वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन जवळपास दोन तास अनेक विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग बंद होते.  पहिल्यांदाच असा प्रकार घडून आल्याने विमानतळ प्रशासनात एकच खळबळ माजली. दरम्यान, काही विमाने परस्पर रायपूरला वळविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, मिहानच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही. प्राप्त माहितीनुसार, शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोराच्या वादळवाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन रनवेवरील दिवे बंद झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


शेकडो प्रवाशांचा मनस्ताप


केबल दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दुरुस्तीला होत असलेल्या विलंबामुळे सुमारे 400 हून अधिक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाल्यानंतर एटीसीकडून सिग्नल मिळाला आणि त्यानुसार विलंबाने विमानांचे आवागमन सुरू झाले. मात्र तोपर्यंत अनेक प्रवासी आल्यापावली घरी परतले. तर अनेक प्रवाशांनी हा बिघाड दुरुस्त होईपर्यंत विमानतळावर बसून वाट बघितली. यात मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांचा समावेश होता. 


इतर महत्वाच्या बातम्या