Dr. Ambedkar Jayanti Live Updates : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम
Dr. B.R. Ambedkar Jayanti : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Ambedkar Jayanti: देशासह राज्यभरात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. मुंबईत चैत्यभूमीवर उत्साहात जयंती साजरी केली जाते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी शिवसेना आणि भाजप नेते देखील हजर होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी अनुयायींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केले अभिवादन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवेत प्रथमच शासकीय आंबेडकर जयंती पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत साजरी केली.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती. भंडारा येथील त्रिमूर्ती चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या माध्यमातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत 8 हजारपेक्षा अधिक विद्यार्थीवर्ग व 300 पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते. समाजप्रबोधन करण्याच्या हेतूने ही रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी होते. त्याचबरोबर विश्वरत्न, तत्वज्ञ, समाजसुधारक अशी डॉ बाबासाहेबांना संबोधली जाणारी विशेषणे व त्यांचे संदेश लिहून ही रॅली काढण्यात आली.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : वर्ध्यात मध्यरात्री केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सिव्हिल लाईन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात रोषणाई करण्यात आली. यावेळी केक कापत फटाक्यांची आतषबाजी करुन जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी अभिवादन केले.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. यवतमाळ येथील संविधान चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देशाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अभिवादन करण्यासाठी जनसमुदायाची सकाळपासून गर्दी झाली होती.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी अभिवादन केलं, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आक्रमक प्रतिक्रिया दिली. या देशात सत्ताधारी संविधानाचा सन्मान करत नाहीत. संविधानाची तोडफोड करून राज्य सरकार स्थापन झालं आहे. संविधानाच्या विपरीत सरकार वागत आहे त्यामुळे अशा लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. संविधानाचा अपमान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे नाटक करत आहे. त्याचा निषेध असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. उद्धव ठाकरे आणी राहुल गांधी हे दोन्ही नेते सालस आणी समजदार असून दोघांचाही उद्देश संविधान वाचविणे हाच आहे. त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो या देशासाठी आणी महाराष्ट्रासाठी फायद्याचा राहील असंही आमदार ठाकूर राहुल गांधी - उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलतांना म्हणाल्या.
डीजे, मिरवणूक, हार-तुरे या सर्वांना फाटा देत, पिंपरी चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. आंबेडकर विचारवंतांनी एकत्र येत पवना नदीत स्वच्छता मोहीम राबवली. शहरातून वाहणारी ही नदी नेहमीच प्रदूषित असते. म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करतानाच पवना नदीला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, जैव वैद्यकीय कचरा, तसेच आरोग्यास हानीकारक ठरणाऱ्या वस्तू नदी पात्रात आढळून आला. पवना जलमित्र ग्रुपने हा अभिनव उपक्रम राबविला, ज्याला अनेक आंबेडकर विचारवंतांनी हातभार लावला.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विविध कलाकारांकडून त्यांना विविध प्रकारे अभिवादन केले जात आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील प्रमोद उबाळे या तरुण कलाकाराने खडू वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे केवळ तीन बाय एक सेंटिमीटर असलेल्या खडूवर देखणी अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांनी साकारली आहे.खडू वर निळा,काळा आणि पिवळ्या रंगाने ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवेत प्रथमच शासकीय जयंती साजरी केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्यावर्षी याच दिवशी याची घोषणा केली होती. थोड्याच वेळात मंत्री उदय सामंत इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते भास्कर जाधव, खासदार सुनील तटकरे, योगेश कदम, शेखर निकम, निरंजन डावखरे आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत राहमार आहेत.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते. धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो किंवा बाबासाहेबांची जयंती अशा सर्व महत्त्वाच्या दिवशी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी लोक येऊन भव्य स्तूपामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करतात, सोबतच बाबासाहेबांच्या अस्थिकलशांचे दर्शन ही घेतात. स्तुपाच्या समोरच बाबासाहेबांची प्रतिमा असून आज सकाळपासूनच लोक त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावत आहेत. त्या ठिकाणी नतमस्तक होऊन बाबासाहेबांप्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विविध कलाकारांकडून त्यांना विविधप्रकारे अभिवादन केले जात आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील प्रमोद उबाळे या तरुण कलाकाराने खडूवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे. केवळ तीन बाय एक सेंटिमीटर असलेल्या खडूवर देखणी अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांनी साकारली आहे. खडूवर निळा, काळा आणि पिवळ्या रंगाने ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आज जगभरात साजरी होत आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वाळूशिल्प साकारण्यात आले आहे. रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प साकारल आहे. वाळूवर रंगांची उधळण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर असं वाळूशिल्प साकारलं आहे.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांच्या जवळपास 100 दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन भरवलं आहे. यामध्ये अनेक जुन्या आठवणी पाहायला मिळत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिकांसोबत काढलेला फोटो, त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेची त्यांनी केलेला पत्रव्यवहार असे अनेक जुने दस्तावेज या चित्रप्रदर्शनात लावण्यात आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे ज्यावेळेस गोलमेज परिषदेत सहभाग घेतला होता त्यावेळीचा देखील एक महत्त्वाचा फोटो या ठिकाणी चित्रप्रदर्शनात लावण्यात आला आहे.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असतानाच नाशिकच्या मनमाडमध्येही जयंतीला जल्लोषात सुरुवात झाली. मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अवघा निळा सागर लोटला होता. रात्री 12 वाजता भीम अनुयायांनी ढोल ताशांच्या गजरात मध्यवर्ती डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ जमत अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या. मनमाड शहर आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला मानला जात जातो. मनमाडमध्ये अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येते. अनुयायांमध्ये जोरदार उत्साह असून शहरातून सुमारे 50 चित्ररथाची मिरवणूक काढण्यात येते . समाजप्रबोधनात्मक देखाव्याचा त्यात भर असतो. चित्ररथाच्या सजावटी कार्यकर्ते तयारी लागले आहे.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यातील जवाहरनगर इथं मध्यरात्री 132 केक कापून अभिवादन करण्यात आलं. जवाहरनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात शेकडो बौद्ध बांधव एकत्र येत हा जल्लोष साजरा केला.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : तब्बल पाच तास मेहनत घेत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी. नांदगावच्या ममता आहेर या विद्यार्थिनीने जयंतीनिमित्त केले अनोखे अभिवादन. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. नाशिकच्या नांदगावातील ममता रवींद्र आहेर या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांची आकर्षक अशी रांगोळी काढत आपल्या कलेद्वारे त्यांना अनोखे अभिवादन केले आहे. विविध रंग संगती साधून एका छोट्या टेबलवर ही रांगोळी साकारतांना तब्बल पाच तास तिने मेहनत घेतली..तिच्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जन्मोत्सवाचे स्वागत 13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजीने करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात शहरातील हजारो युवक जमले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ही फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पार्श्वभूमी
Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 Live Updates : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज 132 वी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगर पालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे सायंकाळी करण्यात येणार आहे. बीएमसीकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
बुलढाण्यात आंबेडकर जयंतिनिमित्त फटाक्याची आतिषबाजी
बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जन्मोत्सवाचे स्वागत 13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजीने करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात शहरातील हजारो युवक जमले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ही फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
परभणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महावंदना होणार आहे. या वंदनेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
धुळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अभिवादन केले जाणार आहे. तर शहरातील संदेश भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झाला आहे.
चंद्रपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात रॅली काढून अनेक संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतील.
वर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्धा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर चौकामध्ये विविध रॅली आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. पहाटेपासूनच आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -