Dr. Anil Awachat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं असून वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. केवळ साहित्य विश्वातच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलं. 


अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.


1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.


केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केली.


पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि मुख्य म्हणजे ओरिगामीतून विविध आकार साकारणं हा त्यांचा आवडता छंद! केवळ स्वत:चा विचार न करता दुसऱ्यांसाठी सतत काही ना काही करत राहणारा परोपकारी असा त्यांचा स्वभाव आहे.  


मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा जन्म


डॉ. अनिल अवचट यांचं लिखाण प्रभावी आहेच, मात्र त्यांचं समाजकार्यही तितकंच उल्लेखनीय आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही पद्धत वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


साहित्यिक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते... एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉ. अनिल अवचट!