मुंबई : राज्यात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. भाजपचे डझनभर आमदार आणि राज्यसभेचा खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आज एक आठवडा पूर्ण होत आहे. मात्र तेव्हाच भाजपला धक्का देण्याची तयारी काही आमदार आणि खासदाराने सुरु केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून 'मेगाभरती'अंतर्गत भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार संपर्कात असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. हे आमदार राजीनाम्याच्या तयारीत असून तिन्ही पक्षनेत्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा करत असल्याचं कळतं. राजनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचा त्यांचा इरादा आहे.

या आमदारांमध्ये मराठवाड्यातील तीन, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश आहे. तर चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपच्या राज्यसभा खासदाराने पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची तयारी दर्शवली आहे. हा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?

विनोद तावडे एकनाथ खडसेंच्या भेटीला, भाजपमधील नाराजी नाट्यावर खडसेंची प्रतिक्रिया

बरेच लोक संपर्कात हे खरं : नवाब मलिक
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमिष दाखवून भाजपने मेगाभरती केली होती. सत्ता गेल्यानंतर तेआमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. काही आमदार अजित पवारांना भेटले, शरद पवारांना भेटले. जुन्या पक्षात परतावं असं त्यांचं मत आहे. बरेचसे लोक संपर्कात हे खरं आहे.

भाजपचा कोणताही आमदार कोणाच्या संपर्कात नाही : आशिष शेलार
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. भाजपचा कोणताही आमदार कोणाच्या संपर्कात नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. ते म्हणाले की, "स्वत:च्या भीतीपोटी निर्माण केलेल्या वातावरणाचा खोटा प्रयत्न आहे. स्वत:चेच आमदार अस्वस्थ आहेत, ते बंडापर्यंत जाऊ शकतील या भीतीपोटी चोराने केलेल्या उलट्या बोंबा आहेत. या वृत्ताचं आम्ही खंडन करतो. भाजपचा कोणताही आमदार कोणाच्या संपर्कात नाही. एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय की मी भाजपसोबतच आहे. एकत्र आलेले तीन पक्ष नाराज आहेत. आम्ही आमचे दरवाजे बंद केले आहेत म्हणून नाहीतर मोठा भूकंप कधीही होईल. बघा पुढे काय होतं?"

जेवढी भरती मोठी, तेवढी ओहोटी मोठी : बाळासाहेब थोरात
भाजपमधील नाराज नेत्यांवर बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही सक्षम नेते होते. दुर्दवाने त्यांना दूर लोटलं. जेवढी भरती मोठी तेवढी ओहोटी मोठी, हा निसर्गाचा नियम आहे, हे होणारच. काहीजण अस्वस्थ आहेत, ती आम्हाला पण जाणवते. जे गेले त्यांना वाटतं चुकीच्या वेळी गेलो. परत येण्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. पण नेते अस्वस्थ आहेत हे नक्की.